आधी मतदारसंघाचा दौरा करतो, मग दांडपट्टा फिरवतो – भास्कर जाधव

3733

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच माजी पालकमंत्री भास्कर जाधव चिपळूणात आले. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी शिवसेनेने आयोजित केलेल्या स्वागत मेळाव्यात माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मतदारसंघाचा दौरा करतो, मग दांडपट्टा फिरवायला सुरुवात करतो, मग पहातो कोण समोर येतो ते. गेल्या 15 वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, असे ते म्हणाले.

भास्कर जाधव यांचे चिपळूण रेल्वेस्थानकातच जोरदार स्वागत झाले. तिथूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक बहादूरशेख नाका येथे आली आणि शिवसैनिकांनी भास्कर जाधवांचे जोरदार स्वागत केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक शहरात दाखल झाली. नगरपालिका आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर येथील आंबेडकर सभागृहात स्वागताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर तालुकप्रमुख प्रताप शिंदे, सभापती विनोद झगडे, प.स गटनेते राकेश शिंदे, न.प गटनेत्या जयश्री चितळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जाधव म्हणाले की, गेल्या 15 वर्षांचा बॅकलॉग तर भरून काढणारच आहे. सुरुवातीला मतदारसंघाचा एक दौरा करतो आणि नंतर दांडपट्टा फिरवायला सुरूवात करतो. मग बघू कोण कसे समोर येतात ते, राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करत होतो, पण आता विचार बदललाय. आता शांत बसणार नाही. तसेच थांबणारही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मी कधी कोणाच्या हक्काचे हिरावून घेतले नाही, घेणार देखील नाही. पण नेहमीच माझ्या वाट्याला संघर्ष आला. माझ्या ललाटी जर संघर्षच असेल तर मी देखील पाठ फिरवणार नाही. शेवटपर्यंत संघर्ष करत राहीन. एकदा का निवडणुकीच्या मैदानात उतरलो तर मात्र माझ्यासमोर कोण आहे, किती मोठा याची चिंता मी कधीच केली नाही आणि करणार देखील नाही. त्यावेळी माझ्यासमोर फक्त माझ्या पक्षाचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा विजय हा एकच उद्देश असतो, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या