धक्कादायक! भातसा धरणक्षेत्रातील तीन भूकंपमापन यंत्रे भंगारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी | ठाणे 

भूकंपाच्या लागोपाठ धक्क्यांनी डहाणू तालुका हादरला असतानाच भातसा धरण क्षेत्रात बसवलेल्या तीन भूकंपमापन यंत्राला अखेरची घरघर लागली आहे. 30 वर्षी जुनी यंत्रे अक्षरशः भंगारात गेली असून भूकंप झाल्यास त्याची तीक्रता मोजणार तरी कशी असा प्रश्न पडला आहे. भातसा धरण परिसरातील अनेक गावांची सुरक्षा यामुळे धोक्यात आली असून जुनी यंत्रे बदलून त्याठिकाणी नवी भूकंपमापन यंत्रे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून डहाणू शहरात भूकंपाचे धक्के बसत असल्याने तेथील ग्रामस्थ भयभीत झाले. प्रसारमाध्यमांनी आवाज उठवताच दिल्लीहून तज्ञांच्या पथकाने येऊन तातडीने आधुनिक भूकंपमापन यंत्रे बसविले. मात्र मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया भातसा धरण भागात बंद असलेल्या यंत्रांकडे मात्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भातसा धरण परिसरात 1982 मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या धक्क्याच्या भीतीने शेकडो ग्रामस्थांनी स्थलांतर केले.

भातसा धरण क्षेत्रातील खर्डी, लाहे व वाशाळा येथे 1984 मध्ये भूकंपमापन यंत्रे बसविण्यात आले. ही यंत्रे आता जुनी व कालबाह्य झाली आहेत. हे यंत्रे भातसा धरण प्रकल्प वसाहतीजवळ आहे, पण हे यंत्रेदेखील दुरुस्तीच्या अभावी पडून असून त्यावर केवळ भूगर्भातील हालचाली व भूकंपाच्या धक्क्याची नोंद होत आहे. पण हे धक्के नेमके किती रिश्टर स्केलचे आहे हे समजत नसल्याने त्याचा काहीच उपयोग नाही अशी माहिती जनसंपर्क विभागाने दिली.

अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा अहवाल

खर्डी, वाशाळा व लाहे येथे बसविण्यात आलेली भूकंपमापन यंत्रे बिघडल्याने ती दुरुस्तीसाठी अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडे ती पाठवली होती. मात्र तपासणीअंती ही यंत्रे कालबाह्य झाल्याने दुरुस्त होऊ शकणार नाही असा अहवाल संस्थेने पाठवला आहे.

जलाशयाला धोका

खर्डीपासून थोड्याच अंतरावर भातसाचा जलाशय असून भूकंपमापन यंत्रे बंद पडल्याने या जलाशयाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भूकंपमापन यंत्रावर रिश्टर स्केलचे नोंद होताच आपत्कालीन यंत्रणा कामाला लागते. मात्र यंत्रे बिघडल्याने कोणत्याही धोक्याचा अंदाज आता येत नाही.