भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक आजपासून पुन्हा सेवेत, अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांना दिलासा

पावसाळी हंगामामुळे बंद असलेली भाऊचा धक्का ते रेवस प्रवासी बोटसेवा शुक्रवार १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. सकाळी साडेसहा वाजता भाऊचा धक्का येथून पहिली बोट सोडण्यात येणार असून ४ वाजता शेवटची बोट सोडण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेने दिली. साडेचार महिन्यांनंतर ही सागरी मार्गावरील सेवा सुरू झाल्याने अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांची गैरसोय दूर होऊन दिलासा मिळणार आहे.

हवामानातील बदल, वादळ, मुसळधार पाऊस, समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाऊचा धक्का रेवस, मोरा-भाऊचा धक्का, गेट वे-मांडवा अशा सागरी महामार्गावरील बोटसेवा बंद करण्यात आल्या होत्या. पावसाळी हंगामात जलवाहतूक संस्थेमार्फत दरवर्षी ही बोटसेवा बंद केली जाते. यातील मोरा- भाऊचा धक्का, गेट वे-मांडवा बोटसेवा दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. मात्र भाऊचा धक्का ते रेवस मार्गावरील बोटसेवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र पावसाने आता उसंत घेतल्यानंतर ही बोटसेवा १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.

हवामानानुसार वेळापत्रकात बदल

खोल समुद्रातील चक्रीवादळांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन एखादी दुर्घटना होऊ नये, तसेच परतीच्या पावसामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अशा काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती जलवाहतूक संस्थेतर्फे देण्यात आली.