ग्रंथयात्रा- भाऊसाहेबांची बखर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्चना मिरजकर << [email protected] >>

बखर हा ऐतिहासिक सत्य आणि अद्भुत वर्णन यांच्या सीमारेषेवर असणारा एक वैशिष्टय़पूर्ण मराठी साहित्य प्रकार आहे. लेखकाच्या स्वामींनी पानिपतच्या संग्रामाची हकीकत लिहून काढण्याची आज्ञा केल्यामुळे एका अज्ञात लेखकाने ‘भाऊसाहेबांची बखर‘ हा ग्रंथ लिहिला.

नानासाहेब पेशव्यांचे भाऊ रघुनाथराव यांनी सूरजमल जाट याच्या कुंभेरीच्या किल्ल्यावर केलेल्या हल्ल्यापासून बखरीला सुरुवात होते आणि इथेच सुरू होते राजकारणी डावपेचांची मालिका. त्याच सुमारास जयाजी शिंद्यांना मारवाड प्रांतातून मदतीसाठी बोलावणे येते आणि ते तिकडे कूच करतात. त्या युद्धाचे वर्णन अडीचशे वर्षांपूर्वीच्या युद्धप्रथेचे दर्शन घडवते.

“त्यांणी स्नांने करून तमाम एकमेकांस निर्वानिरव करून तमाम आंगात चिलखते व बक्तरे घालून, जिरेटोप, पेटय़ा बांधोन, दारुगोळी लोकांस वांटून तंगबार करून, मुहूर्ते सिद्ध होऊन चालिले. मार्गी शकूनही चांगले जाहले. तीस हजार फौज होती. त्यांची निवड करून दोन भाग केले. येकीकडे दत्ताजी सिंदे जाहले आणि येकीकडे जयाजी सिंदे जाहले. दोन्ही सैन्यांच्या गांठी पडल्या.”

अशा अनेक लढायांच्या वर्णनातून मराठय़ांचा पराम वाचकांच्या मनात ठासत जातो. त्या काळची राजकीय परिस्थिती, मराठे सरदारांचे आपापसातील संबंध, हेवेदावे, पेशव्यांशी असलेलं त्यांचं इमान याची आपल्याला ओळख होत जाते.

इकडे दिल्लीत वेगळेच कारस्थान चालू असते. मराठय़ांचं पारिपत्य करण्यास केवळ खंदारचा पादशहा अहमदशाह अब्दाली हाच समर्थ आहे असे ठरवून नजीबखान नावाचा शिलेदार त्याला आमंत्रण देतो आणि अटकेपासून ते दक्षिणेकडील निजामाच्या राज्यापर्यंत पसरलेले मराठय़ांचे वर्चस्व मोडण्याच्या कटाला सुरुवात होते.

मराठय़ांना झुलवत ठेऊन नजीबखान सुजाउद्दौला, आदमखान लंगडा पठाण, मधवसिंघ जयनगरकर, विजयसिंह मारवाडी या सर्वांशी युती करतो आणि अब्दालीला पुन्हा बोलवून घेतो. दत्ताजी शिंदे दिल्लीला पोचतात. यमुनेच्या काठावर शिंद्यांची अब्दालीशी गाठ पडते. जनकोजी शिंदे जबर जखमी होतात. दत्ताजी आणि त्यांचे खासे स्वार दहा हजार दुराणी फौजेत घोडी घालतात आणि निकराचे युद्ध करतात. जखमी जनकोजी शिंदे यांना घेऊन मराठा सैन्य पळून जाते.

माघार घेणाऱयांचे साहसदेखील कमी नव्हते. रात्रभर न थांबता कित्येक कोस घोडय़ावरून प्रवास करणाऱया नऊ महिन्यांच्या गरोदर भागीरथी बाई, प्रसंगावधान राखून महत्त्वाच्या वस्तू घेऊन तत्काल कूच करण्याचा सैन्यास हुकूम देणाऱया, जनकोजींची पालखी खाली टाकून भोयांनी पळून जाऊ नये म्हणून पालखीबरोबर आपला घोडा चालवणाऱया अठरा वर्षांच्या काशीबाई, दंडातून हाड बाहेर डोकावते आहे इतकी जखम झालेली असतानादेखील प्रवास करून उज्जयिनीस पोचणारे, त्यातून बरे होऊन पुन्हा अब्दालीशी लढायला जाणारे जनकोजी शिंदे! या माणसांच्या निश्चयाची, प्रेरणास्रोतांची आणि धीराची आज कल्पनाही करता येणे शक्य नाही.

दत्ताजी शिंदे धारातीर्थी पडल्याचे कळताच सदाशिवरावभाऊ उत्तरेच्या मोहिमेवर निघतात. कुंजपुऱयावर हल्ला करून तो काबीज करतात. अब्दाली चाल करून येतो. मराठय़ांचे एक पथक त्याच्या हाती सापडते, त्याची कत्तल करतो. सदाशिवरावभाऊ दिल्लीला जाण्याचा बेत रद्द करून पानिपतावर मुक्काम करतात.

अब्दाली आणि त्याचे साथीदार चहूबाजूंनी मराठा सैन्याला कोंडीत पकडतात. भाऊसाहेबांच्या लष्करात अन्नाचा तुटवडा पडतो. शत्रूने केलेली कोंडी फोडून दिल्लीस जावे असा निर्णय घेण्यात येतो.

व्यूहरचना करून फौजेने रात्री कसे कूच केले, सरदारांच्या स्त्रियांना अंबारीत बसवून कसे नेले याचे वर्णन वाचताना काळजाचा ठोका चुकतो. पहाटे युद्धाला सुरुवात झाल्यापासून ते भाऊसाहेब आणि विश्वासराव निकराच्या लढाईसाठी अंबारीतून उतरून घोडय़ावर स्वार होतात तिथपर्यंतचा मजकूर श्वास रोखून वाचला जातो.

भाऊसाहेब चार घटकांपर्यंत युद्ध करतात. गर्दीत ते दिसेनासे होतात तेव्हा सैन्याची दिशाभूल होते. कित्येक मातब्बर सरदार आणि हजारो सैनिक मारले जातात.

ही बखर वाचल्यानंतर तो काळ, युद्धाच्या आधी सुरू झालेली कारस्थानांची मालिका, आपल्या एका निर्णयाने हजारो लोकांचे भवितव्य ठरवणारी माणसे हे सर्व मनात जिवंत होऊन उठते. या युद्धाचे गांभीर्य कळते. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना सांगणारा हा ग्रंथ प्रत्येकाने आवर्जून वाचावा.

ब्लर्ब: ‘भाऊसाहेबांची बखर‘ या ग्रंथाविषयी अधिक माहिती ऐका प्रा. विद्यागौरी टिळक यांच्याकडून www.youtube.com/granthayatra भाग 12.