अखिलेश यांना दलितांची नाही तर फक्त त्यांच्या मतांची गरज आहे, चंद्रशेखर आझाद यांची आगपाखड

भीम आर्मी या दलित संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी यासाठी आझाद यांनी अखिलेश यांच्यासोबत अनेकदा बैठका केल्या होत्या. मात्र या बैठकांनंतरही आझाद हे अखिलेश यांच्यावर नाराज आहेत. अखिलेश यांना दलितांची गरज नसून फक्त त्यांच्या मतांची गरज आहे अशी आगपाखड आझाद यांनी केली आहे.

आझाद यांनी अखिलेश यादव यांची गुरुवार आणि शुक्रवार अशी सलग दोन दिवस भेट घेतली होती. दोघांमध्ये आघाडी करण्याबाबत आणि भीम आर्मीला किती जागा दिल्या जाव्यात याबाबत बोलणी सुरू होती. समाजवादी पक्षाने लहान लहान पक्षांना सोबत घेत एक आघाडी केली असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचाही समावेश आहे. आघाडीबाबत ही बोलणी सुरू असताना चंद्रशेखर आझाद यांनी अखिलेश यांच्यावर केलेली टीका ही दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याचे संकेत देत आहे.

आझाद यांनी शनिवारी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजपला रोखण्यासाठी आघाडी व्हावी अशी आमची इच्छा होती, मात्र अखिलेश यांनी आपला अपमान केला असल्याचं म्हटत त्यांनी अखिलेश यांचे वर्तन हे भाजपप्रमाणेच असल्याचं म्हटलं आहे. अखिलेश हे भाजपप्रमाणे नुसते बोलतात असं आझाद यांचं म्हणणं आहे. दलितांच्या घरी जाऊन योगी आदित्यनाथ जेवण करण्याचं नाटक करतात तसंच नाटत सपा करत असल्याचा आरोपही आझाद यांनी केला आहे. कांशीराम यांनी मुलायमसिंह यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी कांशीराम यांच्यासोबत दगाबाजी केली होती. अखिलेश यांचे सरकार स्थापन झालेले नाही, मात्र माझ्या लोकांसाठी आवाज उठवता येत नाही अशा सरकारमध्ये मी सामील होऊ इच्छित नाही असं आझाद यांनी म्हटलं आहे.