
भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 81 वर्षीय कवी वरवरा राव यांना कोविड झाला असून नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी वरवरा राव यांच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा झालेली नाही. त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे अशी माहिती नानावटी रुग्णालयाच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली.
2018 साली वरवरा राव यांना अटक करण्यात आली असून तळोजा मध्यवर्ती कारागृहात प्रकृती खालावल्याने राव यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज केला. त्यातच त्यांना कोविडची लागण झाली. राव यांच्या वकिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करत त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. कोर्टाच्या आदेशानुसार नानावटी रुग्णालयाच्या वतीने राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला.
राव यांचा हायपोनाट्रेमिया हा विकार बरा झाला असला तरी त्यांची न्यूरोलॉजिकल स्थिती अद्याप सुधारलेली नाही. तसेच त्यांना कफचाही त्रास होत असल्याचे रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. त्यावेळी राव यांचे वकील आर सत्यनारायनन यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की राव यांच्या प्रकृतीची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली जात नाही. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.





























































