छत्रपती ग्रुपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरोळ

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्ता व छत्रपती ग्रुपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष माधुरी शिंदे यांची पतीने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली. हत्येनंतर पती सुर्यकांत शिंदे स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदगाव येथे राहत्या घरात सुर्यकांत शिंदे याने आपली पत्नी माधुरी हिचा कुर्‍हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर सुर्यकांत स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. शिरोळचे पीएसआय समीर गायकवाड आणि जयसिंगपूरचे पीएसआय सयाजी शिंदे यांनी फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

माधुरी या भूमाता ब्रिगेड आणि छत्रपती ग्रुपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष होत्या. तर पती सुर्यकांत एका खासगी सायझिंग कंपनीत मजुरी करत आहे. या दाम्पत्याला १ मुलगा आणि १ मुलगी आहे. यापूर्वीही पती सुर्यकांतने माधुरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे बोलले जाते. या घटनेने शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.