
सामना प्रतिनिधी । बीड
जन्माला मुलगा आला आणि हाती मुलगी दिली अशी भूमिका घेत थिटे कुटुंबियांनी मुलीचा सांभाळ करण्यास स्पष्ट नकार देत ही मुलगी आमची नाही. जन्माला मुलगा आला होता असे म्हणत त्या मुलीला जिल्हा प्रशासनाच्या हवाली केले होते. थिटे कुटुंबियाचा मुलगा शोधण्याचे काम सुरू होते. अखेर जिल्हा रूग्णालयाने त्या मुलीची आणि थिटे कुटुंबियाची डीएनए चाचणी घेतली. बुधवारी दुपारी अहवाल दाखल झाला आणि मुलगी थिटे कुटुंबियाचीच असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा रूग्णालयातील गलथान कारभारामुळे मुलगीचा मुलगा कागदोपत्री करण्यात आल्याने एवढा गोंधळ उडाला.
११ मे रोजी छाया थिटे या महिलेने जिल्हा रुग्णालयात झालेल्या प्रसुतीमध्ये मुलीला जन्म दिला. मात्र प्रसुतीच्या वेळी नातेवाईकांनी मुलगा असल्याचे सांगितले आणि जिल्हा रूग्णालयातील सर्व कागदपत्रावर मुलाचा उल्लेख आढळून आला. अवघ्या तीन-चार तासात त्या बाळाची प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. उपचार झाल्यानंतर जेव्हा डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हा या कुटुंबीयाच्या हातात मुलगी पडली आणि एकच गोंधळ उडाला. या कुटुंबीयांनी आम्हाला मुलगा जन्माला आला होता. जिल्हा रुग्णालयातून आम्हाला मुलगी देण्यात आली असा आरोप केला, प्रकरण पोलिसामध्ये गेले. गेल्या आठ दहा दिवसापासून पोलीस तपास करत होते, मात्र काहीच निष्पन्न होत नव्हते. अखेर जिल्हा रूग्णालयाने त्या मुलीची आणि थिटे कुटुंबीयाची डीएनए तपासणी केली, त्यात ती मुलगी त्यांचीच निघाली. थिटे कुटुंबीयांनी मुलीलाच जन्म दिला होता. मात्र जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार कारभार या सर्व गोंधळाला कारणीभूत आहे. कागदपत्रावर मुलाचा उल्लेख केल्याने थिटे कुटुंब सैरभैर झाले होते. अखेर आज या वादावर पडदा पडला. मात्र या सर्व घडामोडीला दोषी कोण हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कारवाई होणार?
जन्माला आलेली मुलगीच होती मात्र जिल्हा रूग्णालयातील जबाबदार कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला आणि कागदपत्रावर मुलाचा उल्लेख झाला. यामुळे हा सर्व गोंधळ उडाला. आता या प्रकरणी कारवाई ही अटळ आहे. प्रसारमाध्यमांना मुलगाच होता अशी प्रतिक्रिया देणाऱ्या परिचारिका आणि संबंधीत डॉक्टर अशा चार जणांवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. चौकशी करून कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे. कारवाई करताना केवळ खालचे मासे गळाला लावले जावू नयेत. या प्रकरणामध्ये इन्चार्जपासून ट्रेनर म्हणून असणारे सर्व दोषी आहेत. त्या दोषींवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
थिटे कुटुंबियातली माणुसकी गेली कुठे?
जन्माला मुलगा आला की मुलगी, ना जन्म दिलेल्या मातेने पाहिले, ना जन्मदात्या बापाने. कोणत्या तरी नातेवाईकांनी सांगितले आणि थिटे कुटुंबीयांनी अवई उठवली. एवढेच काय जेव्हा ते बाळ भुकेसाठी रडत होते. तेव्हा ही माझी मुलगी नाही. या मुलीला मी अंगावरचे पाजणार नाही अशी भूमिका या मातेने घेतली होती. मुलगी कोणाचीही असो तिची भूक भागवणे त्यावेळी आवश्यक होते. या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला आरोग्य प्रशासनाच्या हवाली करत आम्ही सांभाळणार नाहीत अशी भूमिका घेतली होती. अखेर ती मुलगी त्यांचीच निघाली.





























































