
‘बिग बॉस 17’च्यामधील एका स्पर्धकाचे नशीब चमकले आहे. त्या स्पर्धकाला चक्क प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याने मोठी ऑफर दिली आहे. त्यामुळे महाअंतिम सोहळ्याआधीच या स्पर्धकाला लॉटरी लागली आहे.
‘बिग बॉस 17’च्या सिझनचा महाअंतिम सोहळा 28 जानेवारीला होणार आहे. यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. अशातच बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यासाठी अनेक बॉलीवूड आणि टीव्ही स्टार्स या शोमध्ये येत असतात. नुकतेच या शोमध्ये दिग्दर्शक रोहीत शेट्टी आगामी भागात दिसणार आहे. या सीझनमध्येही रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी’साठी स्पर्धक निवडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक कुमार याला ‘खतरों के खिलाडी 14’ साठी ऑफर मिळाली आहे. द खबरीच्या वृत्तानुसार, रोहित शेट्टी शोमध्ये आला आणि त्याने पहिल्या पाच फायनलिस्टशी चर्चा केली. त्यानंतर काही स्टंट करुन घेतले. त्यानंतर त्याने अभिषेकला ‘खतरों के खिलाडी 14’ साठी ऑफर दिली आहे. त्याबरोबर अभिषेकनेही या शोसाठी सकारात्मकता दाखवली आहे. मात्र ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतरच याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्याने म्हटले आहे. द खबरीच्या पोस्टवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहेत. ‘खतरों के खिलाडी’मध्ये अभिषेकच्या एन्ट्रीबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.




























































