
इराण आणि इस्रायलमधील तणाव आता पराकोटीला पोहोचला असून, अमेरिकेने इराणला इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी आज एका अत्यंत आक्रमक निवेदनात म्हटले आहे की, इराणवर आजवरचा सर्वात मोठा स्ट्राईक पॅकेज (हल्ला) केला जाणार आहे. या इशाऱ्यामुळे संपूर्ण जगात, विशेषतः मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.
अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले आहे की, इराणच्या चिथावणीखोर कारवाया आता सहन केल्या जाणार नाहीत. अमेरिकेने इराणमधील महत्त्वाच्या लष्करी तळांना आणि अणुकेंद्रित ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी पूर्ण केली आहे. हेगसेथ म्हणाले, हा हल्ला इतका भीषण असेल की इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे कोलमडून पडेल. “आज इराणला त्यांच्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
या मोहिमेला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेने आपल्या नौदलाच्या विनाशिका आणि अत्याधुनिक ड्रोन ताफा इराणच्या सीमेजवळ तैनात केला आहे. इराणने केलेल्या मागील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी आणि या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.




























































