
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी तयारीला सुरुवात केली आहे. भाजपविरोधी पक्षांची एकजूट व्हावी आणि विरोधक एकजुटीने लढावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासाठी पुढाकार घेत आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वी नितीश कुमार महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता नितीश कुमारांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
या बैठीकत केंद्र सरकारच्या अध्यादेशासंदर्भात चर्चा झाली. नितीश कुमार आपल्या बाजूने आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले. राज्यसभेत सर्व पक्ष एकत्र आले आणि अध्यादेश काढला नाही तर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होऊ शकतो असा संदेश जाऊ शकेल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फेटाळून दिल्लीच्या बाजूने केंद्राने अध्यादेश आणण्याच्या मुद्द्यावर आम्ही दिल्लीच्या जनतेच्या पाठीशी उभे आहोत. केंद्राने हा अध्यादेश विधेयकाच्या स्वरूपात आणला तर सर्व बिगर भाजप पक्ष एकत्र आल्यास राज्यसभेत त्याचा पराभव होऊ शकतो. असे झाले तर भाजप सरकार 2024 मध्ये संपेल असा संदेश जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
निवडून आलेल्या सरकारला दिलेले अधिकार कसे काढून घेतले जाऊ शकतात? ते संविधानाच्या विरोधात आहे. आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभे आहोत. देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा पुनरुच्चार नितीश कुमार यांनी केला.
























































