
बिहारमध्ये जदयू आणि भाजपमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून धुसफुस सुरू आहे. पक्षाचे उपाध्यक्ष आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जदयूला राज्यात जास्त जागा मि”ळाल्या पाहिजे असा हट्ट धरला आहे. त्यावरून प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांच्यात जुंपली होती.
जदयू भाजप युतीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विचारले असता सर्व काही ठीक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आगामी निवडणुकीत जदयुने भाजपपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवावी असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला होता. त्यावरून सुशील मोदी आणि किशोर यांच्यामध्ये ट्विटरवर वाकयुद्धही रंगले होते. दोघांना शांत करण्यासाठी नितीश कुमार यांना मध्यस्थी करावी लागली होती.
सुशील मोदी यांनी ट्विट करून म्हटले होते की, “2020 च्या विधानसभा निवडणुका या पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील. जागावाटपचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील.”
त्यावर प्रशांत किशोर म्हणाले की “बिहारमध्ये नितीश कुमार यांचेच नेतृत्व सर्वोच्च आहे. जनतेनेच हे सिद्ध केले आहे. 2015 मध्ये हरले होते. त्यानंतरही सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद मिळाले. त्यांच्याकडून राजकीय मर्यादा आणि विचारधारेवर व्याख्यान ऐकणे सुखद अनुभव असतो.”
यावर सुशील मोदी यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली होती. मोदी म्हणाले की, जे लोक कुठल्याच विचारधारेचे नाही, जे लोक निवडणुकीची माहिती गोळा करून घोषणा बनवून देणारी कंपनी चालवतात ते पण राजकारणात आले आहेत. युती धर्माच्या विरोधात वक्तव्य करतात आणि विरोधी पक्षांना मदत करतात.”

























































