बिहारी नेत्यांची प्रचाराला ना ना…

इतर राज्यांतल्या निवडणुका आटोपल्या असल्या तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र निवडणुकांचे टप्प्यावर टप्पे असे सुरू आहे. बंगालमध्ये अजून बरेच मतदान बाकी आहे. मात्र, बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर बिहारी मतदार असूनही बिहारचा कोणीही मोठा नेता तिकडे फिरकलेला नाही.

नितीशबाबू बळेबळे भाजपबरोबर सत्तेचा संसार थाटून बसले आहेत. ते एनडीएचे घटक असल्याने भाजपकडून त्यांना बिहारीबहुल मतदारसंघात प्रचारसभांसाठी आवतण होते. मात्र, बिहारमध्ये भाजपने नाकीनऊ आणलेले असल्यामुळे त्याचा वचपा घेण्यासाठी नितीशबाबूंनी बंगालला जाणे टाळले. त्यामागचे दुसरे गणितही महत्त्वाचे आहे. भविष्यात ममता बॅनर्जी एक नवे राजकीय केंद्र म्हणून उदयाला आल्या तर त्या ‘तिसऱया मोर्चा’त घुसण्यासाठी नितीशबाबू आपले चंबूगबाळे आवरून तिकडेही जाऊ शकतात.

त्यामुळे ‘दीदी नको नाराज व्हायला’ हाही त्यामागचा धोरणी हिशेब आहे. इकडे नितीशबाबूंनी माघार घेतलेली असताना तेजस्वी यादवांसारख्या तरुण नेत्याने बंगालला ममतादीदींचे हात मजबूत करण्यासाठी जायला हवे होते. लालू यादवांनी बंगालमध्ये ममतादीदींना पाठिंबा देण्याची घोषणा तुरुंगातूनच केल्यामुळे तेजस्वी बंगालमध्ये प्रचारसभांचा धुरळा उडवतील अशी अपेक्षा होती. मात्र, लालूंचा पाठिंबाही कागदोपत्रीच राहिला. दिल्लीतील तपास यंत्रणांच्या दबावामुळे तेजस्वी यांनीही बंगालला जाण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीला राष्ट्रीय रंग देण्याचा प्रयत्न झाला असला तरी आणि अखंड भाजपने ताकद पणाला लावून ही निवडणूक लढविली असली तरी भाजप, तृणमूल, काँग्रेस व डाव्या पक्षांचा अपवाद वगळता इतर राजकीय पक्षांनी या निवडणुकीपासून ‘सुरक्षित अंतर’ राखल्याचे दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या