बिहार विधानसभेत नवा दारुंबदी कायदा मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये सोमवारी नवा दारूबंदी कायदा मंजूर करण्यात आला. नव्या कायद्यात काही नियम शिथील करण्यात आले आहेत. दारूबंदी कायदा सर्वसामान्यांसाठी आणला होता. गरीबांचा कमाईचा सर्वात मोठा हिस्सा दारूवर खर्च होत होता. तसेच त्यामुळे कौटुंबिक हिंसाचारही वाढला होता. ते थांबवण्यासाठी हा कायदा आणल्याचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी सांगितले. सरकारने दारुबंदी कायद्याची कठोरतेने अंमलबजावणी केली होती. मात्र, आता नव्या कायद्याला मंजूरी मिळाल्याने कायदा शिथील झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच मंत्रीमंडळाने या कायद्यातील बदलांना परवानगी दिली होती. या बदलांमुळे कठोर असणारा हा कायदा बोथट झाला आहे. दारुंबदीची कठोरतेने अंमलबजावणी करणाऱ्या नीतीशकुमार सरकारने या कायद्यात केलेल्या बदलांमुळे कायदा सौम्य झाला आहे. कायदा सौम्य करण्याचा नीतीशकुमार यांनी घेतलेल्या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत.

नीतीशकुमार सरकारने कायद्यात केलेल्या बदलांमुळे विरोधकांनी सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे. या कायद्याचा गैरवापर होत होता असे आरोपही होत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या कायद्यात बदल करण्यात आल्याची चर्चा आहे. या कायद्याचा धाक दाखवून दलित आणि मागास वर्गातील नागरिकांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. बिहारमध्ये हा कायदा लागू झाल्यापासून सुमारे दीड लाख लोकांना अटक करण्यात आली आहे. या कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर नीतीशकुमार यांनी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला होता.