पाकिस्तानने एलओसीवर घुसायचा प्रयत्न केला तर चांगला धडा शिकवू- लष्करप्रमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. याचा सूड घेण्याची संधी पाकिस्तान सीमाभागात शोधताना दिसत आहे. पण, पाकिस्तानच्या या कृत्यांविषयी लष्करप्रमुखांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. सीमाभागात युद्ध करायची पाकिस्तानची इच्छा असेल तर आम्हीही तयार आहोत. एलओसीवर काही केलं तर चांगलाच धडा शिकवू, असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कलम 370 प्रकरणी चीन, अमेरिका, रशियासह मुस्लीम देशांनी हस्तक्षेप करायला नकार दिला आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानशी व्यापारी संबंधही तोडले आहेत. त्यामुळे बावचळलेला पाकिस्तान सीमाभागातून याचा सूड घ्यायच्या विचारात आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेच्या दिशेने पुढे सरकत आहे आणि लडाखच्या दिशेने लढाऊ विमाने तैनात करत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली आहे. या आधी पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यानेही हाच दावा केला होता. त्यावर इशारा देताना रावत यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे. पाकिस्तानने जर सीमाभागात घुसखोरी केली, तर आम्हीही तयारीत आहोत. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशारा रावत यांनी दिला आहे.

जम्मू-कश्मीरच्या सामाजिक स्थितीवरही रावत यांनी स्पष्ट केलं आहे. कश्मिरी नागरिकांसोबत आमची बोलणी सुरू आहेत. त्यात कुठेही तणाव नाही. आम्ही उलट त्यांना निशस्त्र भेटतो आणि तेही आम्हाला अशाच प्रकारे भेटतील अशी आम्हाला आशा आहे, असं रावत म्हणाले.