जेटच्या विमानाला बगळ्याची धडक, वैमानिकाच्या हुशारीमुळे प्रवाशांचा जीव वाचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

मुंबईहून संभाजीनगरला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करतेवेळीस बगळ्याने धडक दिली. प्रसंगावधान राखत वैमानिकाने सुखरूप लँडिंग केले या विमानातील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या अपघातामुळे संभाजीनगरहून मुंबईला होणारे याच विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. एक विमान रद्द झाल्याने थेट संध्याकाळच्या विमानाने प्रवाशांना मुंबई गाठावी लागली. तोपर्यंत या प्रवाशांना विमानतळावरच तळ ठोकून बसावं लागलं.

जेट एअरवेजचे (9W355) हे विमान संभाजीनगरमधील चिकलठाणा विमानतळावर उतरत असताना विमानाचा डाव्या पंख्याला बगळ्याची धडक बसली. या छोट्या अपघातानंतरही वैमानिकाने सुखरूपपणे विमान धावपट्टीवर उतरवले. बगळ्याची धडक बसल्याने विमानाला काय हानी झाली आहे, ते पुन्हा उडण्याची स्थितीत आहे की नाही याच्या सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. तपासण्यांनंतर याच विमानाचे संभाजीनगर-मुंबई उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे मुंबईला जाणाऱ्या 21 प्रवाशांचा खोळंबा झाला. या प्रवाशांमध्ये मराठवाडा आमदार अतुल सावे, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बापू घडामोडे यांचा समावेश होता.