
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनारी निसर्गाच्या सानिध्यात 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 11 आणि 12 जानेवारी असे दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. पक्षी संवर्धनासाठी काय केले पाहिजे तसेच त्यावर काय उपाय करणे गरजेचे आहे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात पहिल्यांदाच पक्षीमित्र संमेलन होत असल्याचे आयोजक रुपाली मढवी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून फोटो प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, प्राणीमित्र संघटना अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, मावळते अध्यक्ष किशोर रिठे, संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसंबे, आयोजक रुपाली मढवी, पक्षीमित्र मोठ्या संख्येने उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. संमेलनाच्या उदघाटनानंतर पक्षीमित्र पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. तर पक्षीमित्रांनी पक्षावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात राज्यतून 300 हुन अधिक पक्षीप्रेमी यात सहभागी झाले आहेत. धुळे येथून सायकलवर पक्षीमित्र संमेलनात दाखल झाले आहेत. संमेलनात पक्षी प्रेमींनी काढलेल्या अप्रतिम फोटोचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणमुळे पक्षाचा मूळ अधिवास हरवत चालला आहे. मानवाचे पक्षाच्या आधिवासावर आक्रमण केले आहे. पक्षी हे निसर्गचक्र राखण्याचे काम करीत आहेत. मात्र त्यांचेच अस्तित्व धोक्यात आलेले आहे. पक्षीमित्र संमेलनातून पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षणाबाबत चर्चा, परिसंवाद, मुलाखती याची मेजवानी पक्षीमित्र आणि प्रेमींना मिळणार आहे. या संमेलनात वन विभागाचाही महत्वाचा सहभाग राहणार आहे

























































