मेंढपाळाच्या मुलाचा लोकसेवा आयोग परीक्षेत डंका; यमगेच्या बिरदेव डोणे याला 551 वी रँक, कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी

परंपरांगत मेंढपाळ व्यवसाय असणाऱ्या कुटुंबातील मुलाने तिसऱ्या प्रयत्नात लोकसेवा आयोग परीक्षेत आय.पी.एस. पदाला गवसणी घालत देदीप्यमान कामगिरी करण्याचा इतिहास घडवला. कागल तालुक्यातील बमगे गावच्या बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 वी रैंक मिळवत अतुलनीय यश संपादन केले आहे. कागल तालुक्यात अशी कामगिरी करणारा तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

2024 मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी देशभरातून लाखो गुणवंत विद्यार्थी अधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत घेऊन आपले नशीब आजमावत असतात. देशपातळीवर सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत बिरदेवचा परीक्षेतील बैठक क्रमांक 66 लाख 7 हजार 925 इतका होता. यावरून ही स्पर्धा परीक्षा किती आव्हानात्मक व महत्त्वाची असते हे समजते, तर या परीक्षेत पहिल्या हजारात येणे हे काय दिव्य असते आणि त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे बिरदेवच्या यशावरून दिसते.

मंगळवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. त्या वेळी बिरदेव बेळगाव येथे मामांच्या वकऱ्यांच्या कळपात होता. बिरदेवचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुरुड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्याच्या जन्मगावी झाले. दहावीच्या परीक्षेत त्याला ९६ टक्के गुण मिळाले. मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे 2016 मध्ये 12वी विज्ञान शाखेतून 89 टक्के गुण मिळवित तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता.

कोणत्याही खासगी क्लासशिवाय त्याने सीईटी परीक्षेत राज्यस्तरावर 7वी रैंक मिळवली होती. त्यातून त्याला पुणे येथील सीईओपी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळाला. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तयारीसाठी त्याने दोन वर्षे दिल्लीत सराव केला. दोन्ही प्रयत्नांत यश मिळाल्याने पुणे येथे अभ्यासाची तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नातच त्याने देशपातळीवर 551 वे स्थान पटकावले.

यमगे या आपल्या गावी छोटयाशा घरात अन् बकऱ्यांच्या संगतीत वडील सिद्धाप्पा यांच्या मेंढपाळ व्यवसायात हातभार लावत त्याने हे लखलखीत यश मिळविले. संपूर्ण यमगे गावासह तालुक्यात त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे. दोन दिवसांनंतर त्याची मिरवणूक काढण्याचा निर्धार गावकऱ्यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना व्यक्त केला. तसेच, त्याचा अभिमान वाटत असल्याच्याही भावना व्यक्त केल्या.

प्रयत्न आणि चिकाटीतून यशाला गवसणी घालता येते, हे ग्रामीण भागातल्या मुलांना निश्चितच प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आपली संगत ही चांगल्या मित्रांसमवेत असली पाहिजे. मुलांनी व्यसनापासून लांब राहिले पाहिजे. परिस्थितीची जाणीव असावी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे. आई-वडील शिकले नाहीत, मात्र मला कष्टाने शिकविले. आज त्यांचे पांग फेडल्याचे समाधान मिळाले आहे. मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे.

– बिरदेव डोणे