जागतिक तापमानवाढीमुळे पक्ष्यांचे आकार बदलले

इस्रायलमधील तेल अवीव इथल्या विद्यापीठातील संशोधकांना एक धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. गेल्या 70 वर्षांत पक्ष्यांच्या आकारात लक्षणीय बदल झाल्याचं संशोधकांना दिसून आले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पक्ष्यांच्या आकारमानात बदल झाल्याचं या संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांनी बारकाईने केलेल्या संशोधनात दिसून आलं आहे की काही पक्ष्यांचा आकार लहान झाला आहे तर काही पक्ष्यांचा आकार हा मोठा झाला आहे.

तेल अवीव विद्यापीठाच्या झूओलॉजी विभागाने आणि नॅचरल हिस्ट्री म्युझियमने संयुक्तरित्या हे संशोधन केलं असून शाई मेईरी यांनी संशोधन दलाचं नेतृत्व केलं होतं. पीचडी विद्यार्थी शहर दुबिनेर हा देखील या संशोधनात सामील झाली होती. मेईरी यांनी म्हटलंय की बर्गमन यांच्या नियमानुसार थंड प्रदेशातील पक्षी आणि प्राणी हे तुलनेने लहान आकाराचे असतात. उष्ण प्रदेशातील प्राणी आणि पक्षी हे तुलनेने मोठ्या आकाराचे असतात. याच नियमाच्या आधारे संशोधकांनी म्हटलंय की जागतिक तापमानवाढीमुळे इस्रायलमधील पक्ष्यांच्या आकारमानातही बदल झाला आहे. मनुष्याच्या अगदी जवळ जाणाऱ्या कावळे आणि कबुतरांच्या आकारात वाढ झाली असून त्यांची वाढ ही त्यांना सतत खायला मिळण्यामुळे झाली असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. कोल्हे आणि लांडगे यांचीही वाढ मनुष्याने टाकून दिलेलं खाणं खाल्ल्यामुळे झाल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. संशोधकांनी 106 विविध पक्ष्यांच्या प्रजातींच्या 8 हजार नमुन्यांचे निरीक्षण केले होते. यामध्ये इस्रायलमध्ये दरवर्षी इतर देशातून येणाऱ्या पक्ष्यांचाही समावेश होता.