
ब्रिटन पुन्हा माथेफिरूच्या चाकू हल्ल्यांच्या घटनेने हादरले आहे. शनिवारी आणि रविवारी बर्मिंगहॅम शहरात माथेफिरू व्यक्तीने अनेक ठिकाणी चाकूहल्ले करीत मोठी दहशत माजवली आहे. या हल्ल्यांत 1 जण ठार झाला असून अन्य 7 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींतील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती शहराचे मुख्य पोलीस अधीक्षक स्टिव्ह ग्रॅहम यांनी दिली. मात्र या हल्ल्यामागे एखादी दहशतवादी संघटना अथवा कुख्यात गॅंग असल्याच्या अंदाजाचा पोलिसांनी स्पष्टपणे इन्कार केला आहे.
ब्रिटनच्या काही भागात याच वर्षी जूनमध्ये चाकूहल्ल्याचे प्रकार घडले होते. त्यात 6 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. काल शनिवारी मध्यरात्री एका माथेफिरूने बर्मिंगहॅमच्या कांस्टीटय़ूशन हिल भागात पादचाऱयांवर चाकूने हल्ले केले. त्यानंतर आज रविवारी लिकेरी स्ट्रीट, इरविंग स्ट्रीट आणि हर्स्ट स्ट्रीट या भागांत या माथेफिरूंचा धुमाकूळ सुरु होता. तो सुमारे दोन तास रस्त्यावर चाकूबाजीचे थैमान घालत होता. त्यानंतर त्याने अनेकांना जखमी करीत पोबारा केला. प्रत्यक्षात ही घटना घडली त्यापूर्वी म्हणजे शनिवारी रात्री साडेबारा वाजता या भागातील रेस्टाँरंटच्या बाहेरील टेबल्सवर मोठय़ा संख्येने लोक जेवायला बसलेले होते. बर्मिंगहॅम पोलीस या माथेफिरूंचा कसून शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी शहरातील वर्दळीचे चौक, हर्स्ट स्ट्रीट, नाइटलाइफसाठी लोकप्रिय असलेले गे व्हिलेज आणि ब्रूमग्रोव्ह स्ट्रीट येथील बंदोबस्त वाढवला आहे.
जूनमध्ये झाले होते असेच हल्ले
यंदा जून महिन्यांत ब्रिटनमध्ये असे दोन चाकूहल्ले झाले होते. 20 जूनला रिडींग शहरात तीन जणांची चाकूने वार करीत हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याला पोलिसांनी अतिरेकी हल्ला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 25 जूनला स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात एका माथेफिरूने भर रस्त्यात चाकूहल्ले करीत 3 पादचाऱयांचा बळी घेतला होता. पोलिसांनी या हल्लेखोराला घटनास्थळीच गोळ्या घालून ठार केले होते.




























































