
बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीत सध्या जोरदार घमासान सुरू असून पक्षाच्या सहापैकी 5 खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. तसेच चिराग पासवान यांना अध्यक्षपदावरूनही हटवले. यानंतर ‘द हिंदू’शी बोलताना चिराग पासवान यांनी संकटात असताना भाजपने मला एकटे सोडल्याचे दु:ख बोलून दाखवले.
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान लोकजनशक्ती पार्टीने एनडीएचे नुकसान केल्याने या संकटाच्या काळात भाजपनेही साथ दिली नाही का? असा प्रश्न चिराग पासवान यांना विचारण्यात आला असता त्यांनी, हो, मला असे वाटते की त्यांनी मला सोडले आहे. भाजपच्या एकाही नेत्याने माझ्याशी संपर्क साधला नाही. मी आणि माझ्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशा काळात पाठिंबा दिला होता जेव्हा त्यांच्याशी हात मिळवण्यासही कोणी तयार नव्हते. राम मंदिर, कलम 370, सीएए आणि तीन तलाकच्या मुद्यावरून नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, मात्र माझे वडील मात्र त्यांच्यासोबत राहिले, असेही चिराग पासवान म्हणाले.
तसेच विधानसभा निवडणूक एकटी लढण्याचा व जदयू विरुद्ध प्रचार करण्याचा निर्णय चुकल्याचे वाटते का? या प्रश्नावर चिराग पासवान यांनी अजिबात नाही, असे उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला (एलजेपी) फक्त 15 जागांची ऑफर देण्यात आली होती. आम्ही होकार दिला असता तर आगामी निवडणुकीपर्यंत आमचा पक्ष अन्य पक्षात विलय करण्यावाचून पर्याय राहिला नसता. तसेच नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तीसोबत मी कसा जावू शकतो? असेही चिराग पासवान म्हणाले.
ते पुढे म्हणाले, माझ्या कुटुंबातील सदस्यांनीच माझी साथ सोडली तर मी अन्य कोणाला दोष कसा देऊ. जदयू नेहमीच पक्ष फोडण्यात सक्रिय असते. आधी ते माझ्या वडिलांच्या मागे पडले होते, आता माझ्या. तसेच दलितांमध्ये फूट पाडण्याचेही काम जदयू करते, असा आरोपही चिराग पासवान यांनी केला.
पुढे काय? या प्रश्नावर बोलताना चिराग पासवान म्हणाले की, मी बिहारमध्ये माझ्या लोकांमध्ये परतणार आहे. मला आता त्यांच्याच आशिर्वादाची गरज आहे. तसेच ही लढाई आपण शेवटपर्यंत लढण्यासाठी तयार असल्याचेही चिराग पासवान म्हणाले. माझ्या वडिलांनी उभ्या केलेल्या पक्षाचा आपण त्याग करू शकत नसल्याचेही ते म्हणाले.





























































