ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर भाजप करणार आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण, डोंबिवलीनंतर आता ठाणे-दिव्यातही मिंधेविरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला आहे. दूषित पाणी, नालेसफाईतील झोल यावरून दिव्यात मिंधे गटाला ‘बुचकळून’ काढणारी भाजप आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानावर धडकणार आहे. वारंवार तक्रार करूनही काही बगलबच्च्यांच्या तुंबडय़ा भरण्यासाठी बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकला जात नसल्याचा आरोप करीत दिव्यातील भाजप पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर 20 जुलै रोजी जोरदार आंदोलन करणार आहेत. तसे पत्रच दिव्यातील भाजपने महापालिका आयुक्तांना दिले आहे.

दूषित पाणी, फुटलेले रस्ते, घाणीचे साम्राज्य यामुळे दिवा बकाल झाले आहे. मिंध्यांच्या नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष केले असतानाच राज्यात मिंधे सरकार आल्यापासून दिव्यात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. मिंधे गटाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे प्रशासनाशी असलेल्या साटेलोटय़ामुळे दिव्यात ठिकठिकाणी बेकायदा बांधकामे फोफावली आहेत.

या बेकायदा बांधकामातून मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाच्या तुंबडय़ा भरल्या जात असल्याचा आरोप दिव्यातील भाजपने केला आहे. दिवा भाजपचे शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी याबाबत आयुक्तांकडे पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने पालिकेचेच या बेकायदा बांधकामांना अभय आहे काय, असा संताप रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. दिव्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ 20 जुलै रोजी दिव्यातील भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घराबाहेर उपोषणाला बसतील, असा इशारा मुंडे यांनी पत्राद्वारे दिला आहे.

एकीकडे मिंधे गटाच्या आशीर्वादाने भरमसाट अनधिकृत बांधकामे वाढत असताना सोयीसुविधांच्या नावाने बोंब आहे, प्यायला पाणी नाही, क्लस्टर योजनेला हरताळ फासला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

हा पैसा आयुक्त कार्यालयात जमा होतो का?
पंतप्रधानांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी व्हावी, अशी आमचीही भूमिका आहे. मात्र अधिकाऱयांना हाताशी धरून रोजच नवीन बेकायदा बांधकामे उभी करून याला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. स्लॅबमागे गोळा केला जाणारा पैसा आयुक्त कार्यालयात जमा होतो का असा संशयदेखील आम्हाला आहे, असा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

प्रत्येक स्लॅबमागे तीन लाखांचा मलिदा
भाजप शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिव्यातील मिंधे गटाचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या माफियागिरीची पोलखोल केली आहे. मुंडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यातील आर्थिक हितसंबंधातून रोजच बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत, प्रत्येक स्लॅबमागे बिल्डरांकडून तीन लाख रुपये उकळले जात आहेत, असा आरोप केला आहे.