
‘ऑपरेशन सिंदूर’चं यश साजरं करण्यासाठी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधून भाजप 9 जूनपासून देशभर घराघरात सिंदूर वाटणार असे सांगण्यात आले होते. तशा बातम्याही आल्या. मात्र ही फेक न्यूज असल्याचे सांगत भाजपने आता पळ काढला आहे.
घराघरात सिंदूर वाटप केले जाणार अशा बातम्या येताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करू नका, असे ठणकावत मोदी स्वतःच्या पत्नीला सिंदूर का देत नाहीत, असा सवाल केला होता तर भाजपचे हे मतांचे राजकारण असल्याची तोफ काँग्रेसने डागली.
दरम्यान, भाजपने आज अधिपृत ट्विटर हँडलवरून ‘घरघर सिंदूर वाटप’ अभियानाबाबत स्पष्टीकरण दिलं. घराघरात सिंदूर वाटप करण्याचा पक्षाचा कोणताही कार्यक्रम नाही. याबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या फेक आहेत, असे नमूद करत भाजपने यातून अंग काढून घेतले.
ही आहे ‘सिंदूर’ची ताकद !
भाजप विवाहित महिलांना सिंदूर वाटायला निघाला होता. चुहूबाजूने तडाखे बसताच ते बॅकफूटवर गेले. सिंदूरच्या ताकदीपुढे भाजपने पळ काढला. आता असे काही अभियानच नव्हते ही फेक न्यूज आहे असे सांगून ते हात वर करत आहे. भाजपवाले खोटारडे आणि ढोंगी आहेत, अशी तोफ काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी डागली.