कर्नाटक पीएसआय भरती घोटाळ्याचे भाजप कनेक्शन, पुण्यातून एका महिला पदाधिकाऱ्याला अटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक परीक्षा घोटाळ्यात सत्ताधारी भाजपचे कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी पुण्यातून भाजप पदाधिकारी असणाऱया दिव्या हागरगी नावाच्या एका महिलेला अटक केली आहे. संबंधित महिला मागील काही दिवसांपासून पुण्यात लपल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केली. 

आयपीएस अधिकारी अमृत पॉल यांची बदली

राज्य सरकारने पीएसआय भरती गैरव्यवहारप्रकरणी भरती विभागातील वरिष्ठ अधिकारी अमृत पॉल यांची बदली केली आहे. 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमृत पॉल यांची भरती विभागातून अंतर्गत सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदी बदली केली आहे. अमृत पॉल हे पीएसआय भरती गैरप्रकारात सहभागी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

असा झाला घोटाळा

  •  आरोपी महिला दिव्या हागरगी यांची कलबुर्गी येथे ‘ज्ञान ज्योती संस्था’ नावाची शैक्षणिक संस्था आहे. त्यांच्या संस्थेत ऑक्टोबर 2021 मध्ये पीएसआय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 
  •  या परीक्षेत वीरेश नावाच्या एका उमेदवाराला 121 गुण मिळाले होते. संबंधित परीक्षेत वीरेशचा सातवा क्रमांक आला होता, पण त्याने केवळ 21 प्रश्न सोडवले असताना त्याला इतके गुण कसे मिळाले? याबाबत संशय आल्याने चौकशी केली असता हा घोटाळा उघडकीस आला.

   प्रत्येक उमेदवाराकडून लाच म्हणून 60 लाख रुपये घेण्याचा करार झाला होता. या उमेदवारांनी पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्ल्यूटूथचा वापर केल्याची बाब समोर आली. परीक्षा सुरू असताना सीसीटीव्ही पॅमेरे बंद ठेवण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे.