बंडखोरीमुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव

1670

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी दूर करणे भाजपला शक्य झाले नाही. या बंडखोरीमुळेच या मतदारसंघात भाजप उमेदवार विनायक पाटील यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात चौरंगी लढत होत होती. शिवसेना भाजप युतीचे विद्यमान आमदार विनायक पाटील पुन्हा निवडणूक रिंगणात होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे कडवे आव्हान होते. भाजपच्या पंचायत समितीच्या सभापती अयोध्या केंद्रे यांनी बंड करुन थेट वंचीतची उमेदवारी मिळवली. त्याचाही फटका भाजपला बसला.

अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या दिलीप राजेसाहेब देशमुख यांचा भाजपला सर्वात मोठा फटका बसला. अपक्ष दिलीप देशमुख यांनी 45846 मते मिळवली. झालेल्या मतदानाच्या 21.33 टक्के मते त्यांना मिळाली होती. वंचित बहूजन विकास आघाडीच्या अयोध्या केंद्रे यांनी 10.3 टक्के मते मिळवली. 22141 मते त्यांना मिळाली. शिवसेना – भाजपा युतीचे विनायक पाटील यांनी 25.79 टक्के मते मिळवली. त्यांना 55445 मते मिळाली. विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी 39.37 टक्के मते मिळवली आणि विजयश्री घेचून आणली. 84636 मते त्यांना मिळाली होती. भाजपचे बंडखोर दिलीप देशमुख यांनी भाजपच्या पराभवास मोठा हातभार लावला. आमदार विनायक पाटील यांनी त्यांच्या मित्रमंडळावरच अधिक विश्वास दाखवला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवल्यामुळेच अनेक जुन्या व निष्ठावंत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी थेट अपक्ष लढणारे दिलीप देशमुख यांची साथ दिली. त्याचा थेट फायदा मात्र राष्ट्रवादी काँग्रसने मिळवला आणि या मतदारसंघावर आपला झेंडा फडकावला.

आपली प्रतिक्रिया द्या