
गेल्या काही दिवसांपासून पिगासीस प्रकरणावरून देशभर राजकीय वातावरण तापले असतानाच फोन टॅपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला.
पिगासीस फोन टॅपिंग प्रकरणावरून देशात व राज्यातही गदारोळ माजला आहे. पिगासीस स्पायवेअरने महाराष्ट्रातही हेरगिरी झाल्याचा संशय प्रदेश काँग्रेसने व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरच पलटवार केला.
सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. या मुद्दय़ावरून या अधिवेशनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होत आहे. त्यासाठी कपोलकल्पित बातम्या पेरून अधिवेशनाच्या कामकाजात अडथळे आणले जात आहेत. काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी दिली आहे, पण या बातमीला कोणताही आधार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, आपली कोणतीही एजन्सी अशा प्रकारचे बेकायदा कृत्य करत नाही. आपल्याकडच्या टेलिग्राफ कायद्याने मोठय़ा प्रमाणावर कठोर नियम केले आहेत. एनएसओ या पिगासीस तयार करणाऱया कंपनीनेही अशा वृत्ताचा इन्कार केला आहे. त्यांनी या प्रसिद्धीमाध्यमाला निराधार यादी प्रकाशित केल्याची नोटीस बजावली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.






























































