
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या चेहऱयाचा वापर करणे नुकसानदायक ठरले. आता उत्तर प्रदेशात त्याची पुनरावृत्ती न करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवले आहे. दिल्लीमध्ये झालेल्या संघ पदाधिकाऱयांच्या बैठकीत भाजपचे भविष्य ठरले. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील आगामी निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपचा मुख्य चेहरा असणार नाही.
सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. प्रादेशिक नेत्यांसमोर नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरला गेल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का लागत आहे. विरोधकांकडून विनाकारण त्यांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे संघनेत्यांनी पुढील निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्वाचाच चेहरा प्रामुख्याने वापरण्याचे ठरवले आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपच्या पराभवापेक्षा विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची संधी सातत्याने मिळाली. काँग्रेसने मोदींची प्रतिमा मुसलमानविरोधी असल्याचे चित्र निर्माण केले होते. त्यामुळे 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार तृणमूल काँग्रेसकडे वळले गेले. यापूर्वीही 2015 मध्ये बिहारमध्ये आणि त्यानंतर दिल्लीतील निवडणुकीतही हा मोदी फॉर्म्युला जास्त फायदेशीर ठरला नव्हता.
उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांकडे संघाचे लक्ष
संघाचे लक्ष आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीकडे आहे. विशेषकरून तेथील मुस्लिम मते भाजपच्या पारडय़ात कशी पडतील याचा विचार सुरू आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिमांची संख्या बरीच आहे. मुस्लिम मते तेथील 75 टक्के जागांच्या निकालात महत्त्वाची ठरू शकतात. तिथे मोदींचा चेहरा घेऊन उतरल्यास मुस्लिमांना एकजूट करण्याची संधी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला मिळू शकते असा संघनेत्यांचा कयास आहे.
मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवण्याची योजना
मागील निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. यावेळी मात्र मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवण्याची भाजपची योजना आहे. त्यामुळे भाजपला मुस्लिमविरोधी ठरवण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळून लावता येणार आहेत. मात्र अद्याप त्यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे.
पोस्टर्सवर मोदीविना योगी
मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा पहिल्यापासून आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील पोस्टर्सवरून तसेच भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींचा फोटो हटवण्यात आला. परंतु तसे काहीच नसून आगामी निवडणूक योगींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोदींचा चेहरा हटवण्यात आला. आता यापुढे पोस्टर्सवर योगींबरोबर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिसणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संघानेच धुरा सांभाळली; दत्तात्रय होसबळेंचा लखनौमध्येच मुक्काम
दोन दिवसीय बैठकीत काही महत्त्वाच्या जबाबदाऱयाही सोपवल्या गेल्या. सरसंघचालक भागवत हे नागपूरला रवाना झाले. मात्र सरकार्यवाह होसबळे यांचा मुक्काम आता नागपूरऐवजी लखनौमध्येच राहणार आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीचे नियोजन त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी हे पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक यांचे समन्वयक असणार आहेत, तर सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांच्याकडे भोपाळ मुख्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
21 जूनला लसीकरण सुरू करण्यामागचे रहस्य
21 जूनला मोफत लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली. त्या दिवशी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांची पुण्यतिथी असल्यानेच हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मोफत रेशन देण्याची योजना दिवाळीपर्यंत सुरू ठेवण्यामागे पुढील निवडणुकांचा विचार आहे. डिसेंबरपर्यंत कोरोना लसीचे 200 कोटी डोस देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.




























































