दहशतवादी ते भाजपचा नेता… वाचा त्याचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानसोबत मिळून जम्मू-कश्मीरला हिंदुस्थानपासून वेगळे करण्यासाठी लढणाऱ्या एका दहशतवाद्याला भाजपने जम्मू कश्मीरच्या पंचायत निवडणुकांमध्ये तिकीट दिले आहे. मोहम्मद फारुक खान असे त्याचे नाव असून त्याने दहशतवादासाठी जवळपास अकरा वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर फारुक पुन्हा दहशतवादाकडे वळला नाही. त्याने सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात केली.

मोहम्मद फारुक खान हा जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट आणि हरकत उल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनांचा दहशतवादी होता. त्यासाठी त्याने अकरा वर्षाच्या तुरुंगवासाची देखील शिक्षा भोगली. ‘मी तुरुंगातून बाहेर आल्यावर मला कुणीच साथ दिली नाही. त्या लोकांनीही नाही, ज्यांच्यासाठी मी हातात बंदूक घेतली होती. मला त्यावेळी माहीत नव्हतं की मी ज्यांच्यासाठी लढत होतो ते फक्त पैसे मोजण्यातच व्यस्त होते. त्यानंतर मग मी मानव कल्याण संघटना ही सामाजिक संस्था स्थापन केली. गेली काही वर्ष मी ही संस्था चालवतोय’, असे फारुक खान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

दरम्यान फारुक खान यांच्यावर ते नेपाळमधून आल्याचा आरोप काही जणांनी केला आहे त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची देखील मागणी केली आहे. मात्र फारुक यांनी सर्व आरोप फेटाळले असून आरोप करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.