भाजप सरकार लवकरच केंद्रातून पायउतार होणार; ममता बॅनर्जींचा घणाघात, बुलडोझर संस्कृतीविरोधात 21 मे पासून तीव्र आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या सत्तेतून हटवले जाईल, असा घणाघात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून बुलडोझर संस्कृती राबवली जात असल्याचा आरोप करत या दडपशाहीविरोधात 21 मे पासून कोलकाता आणि आसपासच्या परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याची घोषणाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राज्यातील नवनिर्वाचित भाजप सरकारकडून अल्पसंख्याक समुदाय आणि रस्त्यावरील फेरीवाल्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या दुकानांवर बुलडोझर चालवून त्यांना उद्ध्वस्त केले जात आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. हे सरकार आपल्या घटनात्मक विचारांशी आणि मूल्यांशी छेडछाड करत आहे. परंतु, हा अन्याय फार काळ टिकणार नाही. लवकरच भाजपला केंद्रातील सत्तेतूनही पायउतार व्हावे लागेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, या बैठकीला टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी देखील उपस्थित होते. दक्षिण कोलकात्यामधील त्यांच्या निवासस्थानाच्या कथित अनधिकृत भागावर बांधकाम पाडण्याची नोटीस कोलकाता महानगरपालिकेने बजावली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले. त्यांना जे करायचे आहे ते करू द्या. माझे घर पाडले किंवा नोटीस पाठवल्या तरी मी अशा धमक्यांना अजिबात घाबरणार नाही. काहीही झाले तरी भाजपविरोधातील आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार अभिषेक बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

देशावर मोठं आर्थिक संकट येणार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा इशारा

यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यावरही नाव न घेता टीका केली. आमच्या राज्याने अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण कॅमेऱ्यासमोर उघडपणे पैसे घेताना दिसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी टीका 2014 मधील नारद स्टिंग ऑपरेशनचा दाखल देत अभिषेक बॅनर्जी यांनी केली.