भाजपच्या नेत्याने ‘X’ वरून ‘मंत्री’पद हटवले; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

bjp-haryana-anil-vij-removes-minister-designation-x

देशात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी नुकतेच त्यांच्या ‘X’ अकाउंटच्या बायोमधून ‘मंत्री’ हे पद हटवले आहे. त्यांच्या या कृतीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या अन्य नेत्यांना देखील अनिल विज यांच्या या कृतीसंदर्भात विचारणा होत आहे.

त्यांनी स्पष्ट केले की त्यांना त्यांची ऑनलाइन ओळख त्यांच्या अधिकृत पदाऐवजी एक व्यक्ती म्हणून वाढवायची आहे. भाजप नेत्याने हे देखील स्पष्ट केले की, त्यांच्या घरी मतदारसंघात “समांतर” पक्ष युनिट चालवल्याबद्दल त्यांनी अलीकडे केलेल्या टीकेशी याचा काही संबंध नाही.

भाजप नेते अनिल विज यांच्याकडे सध्या हरियाणा सरकारमध्ये ऊर्जा, परिवहन आणि कामगार ही खाती आहेत. त्यांनी मंगळवारी त्यांच्या ‘X’ च्या बायोमध्ये ‘Anil Vij Minister Haryana, India’ ऐवजी ‘Anil Vij Ambala Cantt Haryana, India’ असे बदल केले. अनिल वीज यांचे ‘X’ वर ८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, ‘एखादा मंत्री म्हणून आपली ओळख राहण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून सामाजिक ओळख वाढवण्यासाठी आपला प्रयत्न आहे’.

‘मला माझी ऑनलाइन उपस्थिती अनिल विज म्हणून ठेवायची आहे, मंत्री म्हणून नाही. मी मंत्री होण्यापूर्वीच सोशल मीडियावर होतो. माझ्या फेसबुक पेजवरही तुम्हाला ‘मंत्री’ असे लिहिलेले दिसणार नाही’, असे विज यांनी गुरुवारी सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

‘लोक मला अनिल विज म्हणून ओळखतात. जनमानसात माझी तिच ओळख आहे. मी बऱ्याच गोष्टी पोस्ट करत असतो आणि माझे फॉलोअर्स आहेत. माझे फॉलोअर्स माझ्या पदामुळे आलेले नसावेत. अनिल विज कोणत्याही ‘टॅग’ वर अवलंबून नाहीत’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘त्या’ पोस्टशी संबंध नाही!

विज यांनी हेही स्पष्ट केले की ‘X’ च्या बायोमधून मंत्रिपद हटवण्याचा निर्णय त्यांच्या अंबाला कॅन्टोन्मेंटमधील ‘समांतर’ भाजप युनिटबद्दल केलेल्या अलीकडच्या वक्तव्याशी संबंधित नाही. १२ सप्टेंबर रोजी, सात वेळा आमदार राहिलेल्या विज यांनी ‘X’ वर एक पोस्ट करून दावा केला होता की, काही लोक वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये ‘समांतर’ भाजप युनिट चालवत आहेत.