
पश्चिम बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ‘टीव्ही 9’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा श्रींजय हा आज सकाळी 7 वाजता न्यूटाऊन येथील त्याच्या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळला. यानंतर त्याला न्यूटाऊनमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला विधाननगर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं.
याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले आहेत की, “मृत्यूचे कारण अद्याप कळालेलं नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.” याप्रकरणी अद्याप रिंकू मजुमदार किंवा मृताच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून पोलिसांना कोणतीही औपचारिक तक्रार मिळालेली नाही.
दरम्यान, दिलीप घोष यांनी गेल्या महिन्यातच रिंकू मजुमदार यांच्याशी विवाह केला होता. रिंकू या भाजपच्या उत्तर कोलकाता उपनगरीय महिला मोर्चाशी संबंधित आहेत आणि त्यांचा हा दुसरा विवाह आहे. मृत श्रींजय हा रिंकू यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे.