भाजप नेता मुन्ना यादववर विनयभंगाचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूखंड खरेदीच्या व्यवहारातून महिलेला धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचा नेता व कामगार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू मुन्ना यादव याच्यासह चार साथीदारांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. राजवीर यादव, गणेश यादव व प्रमोद डोंगरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुन्नाच्या साथीदारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हा प्रॉपर्टी डीलर आहे. झारखंड येथील सिनू नावाच्या व्यक्तीने त्याला प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे अधिकार दिले आहेत. जयताळा भागात राहणाऱया 40 वर्षीय महिलेने प्रमोद याच्यासोबत पांडुरंगनगर येथे सिनू याच्या मालकीचा भूखंड हा 12 लाखांमध्ये विक्रीचा व्यवहार केला. महिलेने प्रमोद याला सहा लाख रुपये दिले. त्यानंतर प्रमोद याने हा भूखंड राजवीर यादव याला विकला.

दरम्यान, महिलेने घराच्या रजिस्ट्रीबाबत प्रमोद याच्याकडे आग्रह केला, पण त्याने रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली. हा वाद मुन्ना याच्याकडे गेला. काही दिवसांपूर्वी मुन्ना याने महिलेला अजनी येथील कार्यालयात बोलाविले. घराचा आग्रह सोड नाही तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यामुळे महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुन्ना आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.