ऑपरेशन सिंदूरवेळी हवाई दलाचे जवान झोपले होते, आणखी एका भाजप नेत्याकडून लष्कराचा अवमान

भाजप नेते विजय शहा आणि जगदीश देवडा यांच्यानंतर आणखी एक भाजप नेते, आमदार रणवीर सिंह पठानिया यांनी हिंदुस्थानी लष्कराचा अवमान केल्याचे समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हवाई दलाचे जवान झोपा काढत असणार असे पठानिया यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीभेवर ताबा ठेवण्याची तंबी देऊनही भाजपनेते वारंवार हिंदुस्थानी लष्कराचा अवमान करत असल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. उधमपूर एअर फोर्स स्टेशनच्या माध्यमातून रस्त्याच्या रुंदीकरणाची नोटीस आली होती. या नोटिशीविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. या नोटिशीत रस्त्याच्या आजूबाजूची घरे आणि दुकान हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना पठानिया म्हणाले की, आम्ही जवानांना आमच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. परंतु, हे नालायक निघाले. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होते तेव्हा हे लोक झोपा काढत असणार असे पठानिया म्हणाले.