
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक विधाने करून वाद ओढवून घेतला. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली असताना आता भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही एक वादग्रस्त विधान केले आहे. पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक विधान केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली, मला पैसे द्या, त्या काळी 10 रुपये देणारे होते. आता 10-10 कोटी रुपये देणारे लोक आहेत ना? सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये वाचाळवीर आहेत. हे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिले आहे. महापुरुषांनी लोकवर्गणीतून शाळा उभारल्या. तसेच स्वतः जवळचा पैसा खर्च केला. त्यांनी काही भीक मागितली नाही. भीक शब्द वापरून चंद्रकांत पाटील यांनी या महापुरुषांचा अपमान केला. नवीन शाळा काढतात. त्यांना तुम्ही शाळा सुरू करण्यासाठी भीक मागा, अशा शब्दात मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
































































