चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या दावणीला नेऊन बांधा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नगर

अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या वणव्यात होरपळतोय. शेतकऱयांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. अशा घोर संकटाच्या वेळी अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहण्याचे सोडून भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी त्यांची क्रूर थट्टा केली आहे. चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या दावणीला नेऊन बांधा, असा बिनडोक सल्ला शिंदे यांनी केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकासमोर दिला! एवढेच नाही, तर राम शिंदे बोलत असताना त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते फिदीफिदी हसत होते.

महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आले आहे. नगर जिल्हय़ातील पाथर्डी येथे या पथकाबरोबर जलसंधारणमंत्री राम शिंदे हे देखील होते. पाहणी सुरू असतानाच एक शेतकरी राम शिंदे यांच्याकडे आला. त्याने दुष्काळी परिस्थितीमुळे चारापाणी उपलब्ध नाही, जनावरांचे हाल होत आहेत, अशी व्यथा मांडली. यावर राम शिंदे यांनी बेमुर्वतपणे चारापाणी नसेल तर जनावरे खुशाल पाहुण्यांच्या दावणीला नेऊन बांधा, असा अजब सल्ला दिला.

राम शिंदे बोलत असताना त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते त्या शेतकऱयाच्या अवस्थेवर फिदीफिदी हसत होते. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, राम शिंदे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, राम शिंदे यांनी प्रकरण शेकण्याची शक्यता दिसताच माध्यमांवर खापर फोडून चक्क हात वर केले. आपण असे म्हणालोच नाही, अशी लोणकढी थापही त्यांनी मारली.