भाजप आमदार चरण वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंदोबस्तात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाशी विनयभंग केल्याप्रकरणी भंडारा जिह्यातील तुमसर शहर भाजपाध्यक्ष अनिल जिभकाटेसह आमदार चरण वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला आहे.

तुमसर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमागील आवारात कामगार नोंदणी व साहित्य वाटप मेळाव्याचे आयोजन 16 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. साहित्य कमी असल्याने या मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक रजनी तुमसरे या घटनास्थळी आल्या. रात्री 10 च्या दरम्यान रजनी तुमसरे यांनी साहित्याकरिता रांगेत उभ्या गरोदर महिलेला त्रास होत असल्याबाबत विचारणा केली.

यावेळी तेथे उपस्थित असलेले तुमसर शहर भाजपचे अध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी त्या महिलेस त्रास होत असल्यास तुझे साहित्य पोलीस तुझ्या घरी पोहोचवून देतील, असे म्हणत रजनी तुमसरे यांच्याशी अरेरावी केली. दरम्यान, जिभकाटे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक तुमसरे यांचा हात पकडून धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. या प्रकाराची लेखी तक्रार तुमसरे यांनी केली. त्यावरून तुमसर पोलीस ठाण्यात अनिल जिभकाटे व तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण वाघमारे यांच्याविरोधात भादंवि कलम 353, 354, 294, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तुमसर येथे तणावाचे वातावरण होते.