कुकडी पाटबंधारेचे कारभारी अभियंता निलंबित, भाजप आमदार राम शिंदे यांच्या मागणीनंतर कारवाई

कुकडी पाटबंधारे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी माहिती योग्य पद्धतीने दिली नाही व वस्तुस्थिती लपवली म्हणून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केली होती. त्यामुळे शुक्रवारी कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना निलंबित करण्यात आले असून, त्याबाबतचा आदेश जलसंपदा विभागाचे सहसचिव डॉ. सुदेन गायकवाड यांनी दिले आहेत.

नगरमध्ये मागील दोन आठवडय़ांपूर्वी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आमदार राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्यासंदर्भामध्ये माहिती विचारलेली होती. तसेच घोड धरणात किती पाणीसाठा आहे, आदी माहिती विचारली होती. याबाबत कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही. तसेच काही माहिती लपविल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला होता.

या संदर्भामध्ये त्यांनी पालकमंत्र्यांकडे मागणी केल्यामुळे त्याचा काही परिणाम झाला नाह़ी मागील आठवडय़ामध्ये आमदार शिंदे यांनी निलंबन का केले नाही, असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिल्यानंतर यंत्रणा जागी झाली. मराठा आरक्षणासाठीच्या अधिवेशनानंतर शिंदे यांना पालकमंत्री यांनी त्यांचा प्रस्ताव पाठविला आहे. दोन दिवसांत कारवाई होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार देशमुख यांचे निलंबन केले.