सरकार बनवता न आल्याच्या दुःखातून चंद्रकांतदादांची वक्तव्ये! अजित पवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 25 वर्षांपासूनचा मित्रपक्ष शिवसेना त्यांच्यापासून बाजूला गेला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सत्तेचे स्वप्न भंगले अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेतला. भाजप आमदारांची संख्या 105 असूनही त्यांना सरकार बनवता आले नाही. हे दुःख त्यांच्या मनाला खूप वेदना देत आहे. त्यामुळे सातत्याने अशाप्रकारची वक्तव्ये त्यांच्याकडून होत असल्याची टीका पवार यांनी केली.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला गृहखाते देऊ नये या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, नागपूर अधिवेशनातही अशा प्रकारची काही वक्तव्ये केली गेली. त्या वक्तव्यांबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले हे आपण सर्वांनी पाहिले आहे. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते’ व ‘कावळ्याच्या शापानं गुरे मरत नसतात’ अशा मराठीतील म्हणींचा उच्चार करीत अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेतला.