सामना प्रतिनिधी । नगर
शहरात फ्लेक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भाजपने प्रचार सुरू करत नगरकरांना मूर्खात काढण्यास सुरुवात केली आहे. बेरोजगारीसारखा केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरचा प्रश्न महापालिका निवडणुकीच्या व्यासपीठावर मांडला आहे. चुकीच्या पद्धतीने फ्लेक्सबाजी सुरू असून चायनिज दिवे लागले नसल्याने अंधार कुठे पडलाय? ही विचार करण्याची गोष्ट आहे. केंद्र व राज्य पातळीवरील प्रश्न घेवून आम्ही जर फ्लेक्स लावायला सुरुवात केली तर शहरात जागा पुरणार नाही. या फ्लेक्सला योग्य वेळी प्रत्युत्तर देवू, अशा शब्दांत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी भाजपवर हल्ला चढविला आहे.
शिवालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राठोड म्हणाले की, शहरातील एका फ्लेक्सवर ऑफिसची तोडफोड केल्याचा मजकूर होता. मुळात सरकारी ऑफिसची तोडफोड झाल्याच्या प्रकरणात भाजपचेच आमदार मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात ते तुरुंगवारी करून आलेत. त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ते फलकबाजी करत असल्याचा टोला लगावत तो फलक का काढावा लागला? असा सवालही त्यांनी केला आहे.
महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी शिवसेनेने पूर्ण केली आहे. प्रत्येक प्रभागात आमच्याकडे जागेपेक्षा अधिक उमेदवार आहेत. सध्यातरी युतीबाबत चर्चा नाही. वरीष्ठांकडून याबाबत निर्णय केले जातात. वरीष्ठांकडून आदेश आल्यास पुढील निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेने सुरू केलेल्या आरोग्य शिबिराचा २० ते २५ हजार पेक्षा जास्त नगरकरांनी लाभ घेतला आहे. १६ दिवसात ३२ शिबिरे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली. अल्प दरात चष्मे वाटप केले जात असून बहुतांशी भागात आमच्या नगरसेवकांनी मोफत चष्म्यांचे वाटप केल्याचे राठोड यांनी सांगितले.

























































