25 कोटी आणि मंत्रिपद, दिल्लीतील आपचे सरकार पाडण्यासाठी भाजपची ऑफर; राष्ट्रपती राजवटीची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्हाला अनेक दिवसांपासून समजावण्याचा प्रयत्न करतोय. दिल्लीत लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यानंतर काहीच मिळणार नाही. त्यामुळे 10 आमदार भाजपमध्ये घेऊन या. प्रत्येकाला 25 कोटी रुपये देऊ आणि मंत्रीपदही देऊ, अशी ऑफर भाजपनेत्यांनी दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट करत आपचे आमदार ऋतुराज झा यांनी दिल्लीच्या भरविधानसभेत आज पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस एक्स्पोझ केले.

ऋतुराज झा पुढे म्हणाले, मी कुठे जाणार आहे हे आधीपासूनच त्यांना माहीत होते. दर्यापूर येथे रविवारी रात्री लग्नसमारंभात 25 कोटींची ऑफर दिल्यानंतर आज सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी इंटरनेट कॉलिंग क्रमांकावरून पह्न आला. आपल्यात जे काही बोलणे झाले त्याबद्दल कुणाला सांगितले तर ठीक होणार नाही, अशी धमकी सातत्याने देण्यात येत असल्याचा आरोपही झा यांनी केला. मोबाईल फोन हा सावलीसारखा प्रत्येकाजवळ असतो. मोबाईलच्या माध्यमातून कोण कुठे आहे, त्याच्या आजूबाजूला कोण आहे हे सगळे कळते. त्यामुळे भाजपनेत्यांचे पह्नही तपासा, अशी मागणीही झा यांनी केली. दरम्यान, यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही आपच्या आमदारांना 25 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला होता.

शेवटच्या श्वासापर्यंत केजरीवाल यांच्याशी गद्दारी करणार नाही

अरविंद केजरीवाल यांना खोटय़ा प्रकरणात तुरुंगात टाकले. आता आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. पण, आम्ही घाबरणार नाही. आम्ही अरविंद केजरीवाल यांच्याशी गद्दारी करणार नाही, त्यांच्यासोबत मरेपर्यंत राहणार. त्यांनीच आम्हाला राजकारणात बोट धरून चालायला शिकवले. असे झा यांनी ठामपणे सांगितले. आम्हाला काम करायचे आहे; पण हे असे घाणेरडे राजकारण सुरु आहे याकडे त्यांनी विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले.

आता इंटरनेट कॉलिंग करून त्रास देत आहेत. जे काही बोलणे झाले त्याबद्दल कुणाला सांगितले तर चांगले होणार नाही अशी धमकीही देत आहेत, असा आरोपही झा यांनी केला. तसेच ज्या इंटरनेट क्रमांकावरून पह्न आला त्याची चौकशी झाली पाहिजे, भाजप नेत्यांचे मोबाईल क्रमांकही तपासा, अशी मागणीही त्यांनी केली.

पंतप्रधान जे करताहेत ते देशासाठी चांगले नाही!

राऊस एव्हेन्यू न्यायालयात जाताना आज अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही करताहेत ते देशासाठी ठीक नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला.

तिहारमध्ये वाचणार रामायण

केजरीवाल यांनी भगवद्गीता, रामायण आणि नीरजा चौधरी यांचे हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड्स ही तीन पुस्तकs देण्याची मागणी केली. दरम्यान, केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्यांची तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली.