देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपमधील ज्येष्ठ नेते नाराज आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मर्जीही त्यांच्यावर खप्पा असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षात कुजबुज होत आहे.

द प्रिंट या वेबासाईटने याबाबत वृत्त दिले आहे. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात दोन गट पडले आहेत. एक गट हा देवेंद्र फडणवीस यांचा आणि दुसरा वरिष्ठ नेत्यांचा.

फडणवीस यांनी सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवल्याने अनेक नेते मंडळी नाराज आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचे मंत्रिपद हळूहळू कमी करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे, तावडे आणि खडसे यांचे तिकीटकही कापण्यात आले. त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते फडणवीस यांच्यावर नाराज आहेत.

भाजप महाराष्ट्रमध्ये अंतर्गत गटबाजी आणि धुसफुस असली तरी त्याबाबत चकार शब्द काढायचा नाही असे आदेश दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षातील गटबाजीबद्दल काहीच बोलायचे नाही, हा अलिखित आदेश आहे. राज्यात सर्वकाही आलबेल आहे, फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल काहीच शंका नाही असा संदेश पक्षाला द्यायचा आहे.

पूर्वी आणि आता

एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पूर्वी अटल-आडवाणी यांच्या काळात पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात होते. त्यात राज्याचा वाटा 70 टक्के तर केंद्राचा वाटा हा 30 टक्के असायचा. पूर्वी सोशल इंजिनिअरिंग समोर ठेवून राज्यसभा आणि विधानपरिषदेची तिकिटं दिली जायची. पण आता एखादा व्यक्ती पक्षाची विचारसरणी किती प्रभावीपणे मांडू शकतो यावर एखाद्या व्यक्तीला तिकीट दिली जाते, असे या वृत्तात म्हटले आहे.

राज्याच्या निवडणुकीनंतर फडणवीस यांना सत्ता खेचून आणताना अपयश आले म्हणून मोदी आणि शहा फडणवीस यांच्यावर नाराज होते. परंतु या दोघांचा विश्वास संपादन करण्यात फडणवीस यांना यश आले हे विधान परिषद निवडणूक आणि बिहार निवडणुकीत समोर आल्याचे वृत्तात नोंदवण्यात आले आहे.