खुद्द आडवाणीच म्हणाले होते, बाबरीच्या घुमटावर चढलेले मराठी बोलत होते आणि भाजप नेत्यांचे ऐकत नव्हते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, अशी वल्गना करून बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडलीच नाही, असा दावा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज शिवसेनेने पुराव्यासह उघडे पाडले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा त्यावेळचा व्हिडीओ शिवसेनेने व्हायरल केला असून ‘बाबरी’च्या घुमटावर चढलेले मराठी बोलत होते आणि भाजप नेत्यांचे ऐकत नव्हते, असे तेव्हा आडवाणीच म्हणाले होते.

बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शिवसेना नेते , खासदार संजय राऊत यांनी ‘‘बाबरी कोणी पाडली? ऐका’’ असे म्हणत लालकृष्ण आडवाणींचा 29 डिसेंबर 2000 रोजीचा व्हिडीओ ट्विट करत फडणवीस यांचा दावा खोडून काढला. शिवसेना कार्यकर्ता बॉम्ब घेऊन अयोध्येला जाणार, शिवसेना प्रदेश प्रमुखांच्या घरावर छापा, खवळलेल्या हिंदू महासागराने राजजन्मभूमीचा ताबा घेतला, अशा बातम्यांची कात्रणेदेखील  त्यांनी ट्विट केली आहेत.

सीबीआयचा अहवाल तपासा

बाबरी पाडली त्यावेळी शिवसेना कुठे होती? हे भाजप नेते सुंदरसिंह भंडारी यांना जाऊन विचारा. त्यावेळचा सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयनं संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. यातून शिवसेना कुठे आहे? असं विचारणाऱया अज्ञानी लोकांना कळेल, शिवसेना कुठे होती, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

आडवाणी काय म्हणाले…

बाबरी मशीद पाडणे ही खूप मोठी चूक होती. त्यात काहीही शंका नाही. मी पहिल्यांदा उमा भारती यांना तिथे पाठवलं आणि सांगितलं की, त्यांना खाली उतरवा. त्यांना सांगा की, असं काही करू नका.

जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, मशिदीवर काही लोक आहेत आणि ते ‘मराठी’त बोलत आहेत. ते माझं ऐकत नाहीत. त्यानंतर मी प्रमोद महाजनांना पाठवलं.

ते तिथे गेले, पण तेही हताश होऊन परत आले. त्यानंतर मी माझ्या सोबतच्या पोलिसांना सांगितलं की, मला वर जायचं आहे, पण ते मला म्हणाले की, आम्ही तुम्हाला त्याची परवानगी देऊ शकत नाही.