पंचायत समितीला मिळालेले पुरस्कार पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असतानाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

परळी व अंबाजोगाई पंचायत समितीला त्यांच्या उत्कृष्ट कामांचा गौरव म्हणून ग्रामविकास विभागाच्या वतीने आज देण्यात आलेले पुरस्कार हे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असतानाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र हे पुरस्कार आपणच पटकावले अशा अविर्भावात फुकटची शाबासकी घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने गुरुवारी यशवंत पंचायत राज अभियानातंर्गत   उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात परळी व अंबाजोगाई पंचायत समितीलाही रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार या दोन्ही पंचायत समित्यांना सन २०१६-१७ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल देण्यात आला. या वर्षात या दोन्ही पंचायत समित्या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या.त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच तत्कालीन सभापती, उपसभापती व अधिकारी उत्कृष्ट काम करून पुरस्काराचे मानकरी ठरले.

गतवर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका  झाल्यानंतर १४ मार्च २०१७ रोजी नवीन सभापतीची निवड झाली. जो पुरस्कार आज त्यांनी फक्त स्विकारला ते काम त्यांना करताच आले नाही, अशी एकंदरीत  वस्तुस्थिती यामागे असताना या पुरस्काराचे खरे मानकरी आम्हीच आहोत अशा अविर्भावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी  फुकटची शाबासकी घेत स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न सुरू केला, एवढेच नव्हे तर पत्रकारांना तशी माहितीही पुरविली, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.