भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षाची गुंडगिरी, एसटी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेऊन कार्यालय बंद ठेवण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याप्रकरणी भाजपच्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखसह सहाजणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुखांच्या या गुंडगिरीचा संपात भाग न घेतलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे.

सोलापुरात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, या संपात भाजप नेत्यांच्या दबावामुळे कर्मचारी सहभागी झाल्याचे उघडकीस आले आहे. सोलापुरातील कार्यालयात अधिकारी विलास विठ्ठल राठोड व त्यांचे सहकारी कार्यालयात बसून कामकाज करत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गणेश भोसले, नितीन करजोळे, गीता पाटोळे, धनश्री खटके, सविता कस्तुरे यांच्यासह 15-20 जणांच्या जमावाने तुम्ही एसटी चालक/वाहक संपात सहभागी का होत नाही, असे म्हणत दमदाटी सुरू केली.

कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास तुम्ही कसे काम करता तेच बघतो, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. यावेळी राठोड हे आपली बाजू मांडत असताना अर्वाच्च भाषा वापरून देशमुख हे त्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांतही भीतीचे वातावरण पसरले होते. जमावातील काहीजणांनी कर्मचाऱ्यांचे जेवणाचे डबेही काढून घेतल्याचा प्रकार दिसून आला. याप्रकरणी एसटी महामंडळाचे अधिकारी विलास राठोड यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.