
सामना प्रतिनिधी । नगर
नगर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन बंडखोरी केलेल्या सात उमेदवारांना भाजपाने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाचे शहर सरचिटणीस किशोर बोरा यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे 267 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. पक्षाने इलेक्टिव्ह मेरीट तपासून उमेदवार रिंगणात उतरवले. यात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षातील जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. यात माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे, आशा विधाते, प्रतीक बारसे, विद्यमान नगरसेविका मनिषा बारस्कर, गायत्री प्रशांत चोरडिया, प्रितेश गुगळे, माजी नगरसेवक शिवाजी लोंढे यांच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

























































