
हिंदी भाषेच्या सक्तीवरून तामीळनाडू भाजपने केंद्रातील मोदी सरकार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धक्का दिला आहे. तामीळनाडूवर हिंदी भाषा थोपवू देणार नाही, अशी सडेतोड भूमिका तामीळनाडूतील भाजप प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी जाहीर केली. शहा यांनी नुकतेच दुसऱ्या राज्यांतील लोकांशी हिंदीत बोलण्याचे आवाहन केले होते.
अमित शहा यांच्या विधानानंतर तामीळनाडू भाजपने आपली भूमिका जाहीर करीत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. आम्ही हिंदी शिकू शकतो, मात्र आमच्यावर हिंदी थोपवू देणार नाही. आम्ही हिंदुस्थानी आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक भाषा शिकावी लागेल, अशी कुठलीही परिस्थिती इथे नाही, असे अन्नामलाई यांनी नमूद केले.
देशात तामीळ ही संपर्क भाषा झाली तर अभिमान वाटेल!
आपल्या देशात तामीळ ही संपर्क भाषा असेल तर भाजपला अभिमान वाटेल. तामीळनाडू सरकारने इतर सर्व राज्यांना पत्र लिहून त्या त्या राज्यांमध्ये 10 तामीळ शाळा सुरू करण्यासाठी विनंती करावी. तसे झाले तर भाजप त्याचे स्वागत करेल, असे अन्नामलाई यांनी नमूद केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुसऱ्या राज्यांतील लोकांशी हिंदीत संवाद साधण्याचा सल्ला दिला होता. गेल्या आठवडय़ात संसदीय राजभाषा समितीच्या 37 व्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले होते. त्यावर दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांनी आक्षेप घेतला आहे.





























































