
राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली. शेगाव तालुक्यातील खातखेड गावातील राजू ज्ञानदेव तलवारे (35) असे त्या शेतकऱयाचे नाव आहे. आपल्या शेतातच भाजपचे टी शर्ट घालून त्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
जिल्ह्यातील जळगाव जामोद या मतदारसंघातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार दौऱयाआधीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी 11 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांचा हा मतदारसंघ आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही बाजू मांडलेली नाही.





























































