भाजपने गुडघे टेकले; सत्ता स्थापण्यास असमर्थ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून आले तरी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करता येत नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सरकार स्थापन करू शकत नसल्याचे भाजपच्या वतीने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगण्यात आले. राज्यपालांना भेटल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची दोनदा बैठक झाली.  सत्तास्थापनेच्या दावा करायचा की नाही याचा निर्णय सकाळी झाला नाही. मग पुन्हा दुपारी चार वाजता बैठक घेण्याचे ठरले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपच्या नेत्यांशी संवाद साधला. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे लक्षात आल्यामुळे अखेर सत्तास्थापनेचा दावा सोडून देण्याचे आदेश अमित शहा यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना दिले. या बैठकीला मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्रसिंह यादव, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आशीष शेलार आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. त्यामुळे काल राज्यपालांनी भाजपला नव्याने महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो. आम्हाला महायुती म्हणून जनादेश मिळाला, पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येऊ इच्छित नाही. त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही असे राज्यपालांना आम्ही सांगितले आहे. जनादेशाचा अनादर करून जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीला घेऊन सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दिवसभरातील धावपळ

सकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक. कोणताच निर्णय न झाल्याने पुन्हा दुपारी 4 वा. बैठक घेण्याचे ठरले.
दुपारी 12.30 – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हॉटेल रिट्रिट येथे शिवसेना आमदारांना मार्गदर्शन.
दुपारी 12 – काँगेसचे आमदार जयपूर येथील रिसॉर्टमध्ये असून मल्लिकार्जुन खरगे यांनी या आमदारांची बैठक घेतली.
सायं. 5 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रफुल्ल पटेल यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे चर्चा.
दुपारी 4 – भाजपच्या कोअर कमिटीची पुन्हा ‘वर्षा’वर बैठक. एक तासाच्या खलबतानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजभवनावर रवाना.
सायंकाळी 6.15 – राजभवनातून भाजप नेते पुन्हा ‘वर्षा’च्या दिशेने रवाना. ‘वर्षा’वर बैठक.
संध्या 7.30 – भाजपच्या असमर्थतेनंतर काँग्रेसची जयपुरात पुन्हा बैठक.
रात्री 8 – राज्यातील दुसऱया क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांना राज्यात सत्तास्थापन करण्याचे निमंत्रण दिले. भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर काही तासांतच राज्यपाल कोश्यारी यांनी तातडीने शिवसेनेला पत्र पाठवले.

रात्री 8.15 – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी तातडीने पक्षनेत्यांची बैठक बोलावली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे तातडीने मढ येथील रिट्रिट हॉटेलवरून ‘मातोश्री’च्या दिशेने रवाना झाले.