
गेल्या काही वर्षांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या जातीयवादी धोरणाने देशाची राज्यघटना कमकुवत केलीय. पण सरकारच्या या धोरणाविरुद्ध आंदोलन करताना होणाऱ्या हिंसाचार आणि रक्तपाताचे मात्र समर्थन होऊ शकत नाही, असे परखड मत बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी व्यक्त केले.
सत्ताधारी भाजपच्या जातीयवादी व संकुचित धोरणांमुळे देशातील जनतेसाठी 2019 हे वर्ष वेदनादायीच ठरले आहे. सरत्या वर्षाचा शेवटच हिंसाचार व रक्तपाताने व्हावा यासारखे देशाचे मोठे दुर्दैव ते कोणते, असे वक्तव्य मायावती यांनी केले.
हिंदुस्थान हा विविध धर्माचे, पंथाचे नागरिक एकोप्याने राहणारा देश आहे. त्यामुळे केंद्र अथवा राज्य सरकारांविरुद्ध आंदोलन करताना कोणत्याही धर्म किंवा पंथाच्या नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी निदर्शकांनी घ्यायलाच हवी आणि आंदोलनात हिंसाचाराचे समर्थन कदापि होऊ शकत नाही याची जाण आपण ठेवायला हवी.
– मायावती, बसपा अध्यक्ष


























































