भाजपच्या बालेकिल्ल्यात खडसेंचा सुरुंग, जळगावमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला हादरे देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा जामनेरमध्येच खडसे यांनी सुरुंग लावत सुमारे दोनशे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडवून आणला. यामुळे माजी मंत्री गिरीश महाजन यांना यामुळे चांगलाच धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर जळगावमध्ये भाजपमधील आऊटगोइंग वाढले आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले महाजन यांच्या मतदारसंघातील ‘दोन बस’ भरुन कार्यकर्त्यांनी खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर राष्ट्रवादीचे घडय़ाळ हाती बांधले. यापूर्वी सोमवारी जळगावमधील 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पक्षात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज आहेत. हळूहळू त्याचा परिणाम दिसून येत असून अजून अनेकजण राजीनामा देतील, असा दावा खडसे यांनी केला आहे.

नगरमध्येही भाजपला गळती

नगरमध्येही भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यात भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी असून पुढील काळात भाजपातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या